Tuesday, 29 March 2011

बाकी सगळं ठीक आहे!

प्रिय आई आणि बाबांस ,

होस्टेलमध्ये कधी कधी लाईट नसते,
आंघोळीला गरम पाणी नसतं ,
गरमीमुळे झोपचं लागत नाही,
पण बाकी सगळं ठीक आहे!

मेसमध्ये पोळ्या कडक असतात,
भाजी एकतर कच्ची नाहीतर बेचव असते,
भातामध्ये खडे सापडतात,
बाकी सगळं ठीक आहे!

मित्रांना उधारी देऊन माझे पैसे संपतात,
मला गरजेपुरते पैसे देऊन ते वेळ मारतात,
मित्र आहेत शेवटी, मित्र असेच असतात,
बाकी सगळं ठीक आहे!

कॉलेजमध्ये धमाल असते,
लेक्चर्स, प्रेझेन्टेशनची मज्जा असते,
कॉलेजमधली दुनियाच वेगळी आहे,
बाकी सगळं ठीक आहे!

सर आणि मैडम खूप चांगले आहेत,
मित्रमंडळी नेहमी सोबत असतात,
पण तरीही काहीतरी मिसिंग वाटत,
बाकी सगळं ठीक आहे!

काळ मित्र घरून परत आला,
त्याच्या आईने आमच्यासाठी लाडू पाठवलेत,
छान आहेत! पण तू बनवतेस तसे लाडू नाहीत,
बाकी सगळं ठीक आहे!

होस्टेलवर दिवाळीला खूप फटाके फोडले,
पहिल्यांदा दिवाळीला घरी नव्हतो,
तुमची सर्वांची खूप आठवण आली,
बाकी सगळं ठीक आहे!

रोज फोनवर बोलणं होतं,
घरातल्या सगळ्या खबरा मिळतात,
पण मी तिथे प्रत्यक्ष नसतो याचं वाईट वाटत,
बाकी सगळं ठीक आहे!

दिवसभर कॉलेजमध्ये दंगा करतो,
संध्याकाळी मित्रांसोबत मज्जा असते,
पण रात्री झोपताना डोळ्यांत पाणी असतं,
बाकी सगळं ठीक आहे!

Saturday, 26 March 2011

'जीवन '= 'G-one'

जीवनातील सुखाचं रहस्य
तेव्हा मला कळलं,
जेव्हा 'जीवन' मी
'G-one' असं लिहिलं!

'One' म्हणजे 'एक', पण
'G' चा अर्थ काय आहे?
'G' चे अनेक अर्थ
माझ्याजवळ तयार आहेत!

'G' चा अर्थ तुम्ही
'GOD' घेऊ शकता,
'सबका मलिक एक' म्हणून
सुखी जीनल जगू शकता!

'G' चा अर्थ तुम्ही
'GOAL' असं घेऊ शकता,
जीवनातील एक ध्येय पूर्ण करून
सुखी जीनल जगू शकता!

'G' चा अर्थ तुम्ही
'GIRL' असं घेऊ शकता,
एकाच मुलीशी एकनिष्ठ राहून
सुखी जीनल जगू शकता!

'G' चा अर्थ तुम्ही
'GAME' असं घेऊ शकता,
जीवन हा एक खेळ मानून
सुखी जीनल जगू शकता!

'G' चा अर्थ काहीही असला
तरी जीवन तुमच्याच हाती आहे,
ते कसा जगायचा?
हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे!

Friday, 25 March 2011

क्षण एक पुरे प्रेमाचा!

जीवनातला प्रत्येक दिवस
म्हणजे थोडं थोडं मरण्याच,
त्या मरणाचा आनंद लुटण्यासाठी
क्षण एक पुरे प्रेमाचा!

रोजच्याच त्या दुखांसाठी
येतो कंटाळा रडण्याचा,
त्या दुखाना सामोरं जाण्यासाठी
क्षण एक पुरे प्रेमाचा!

दरवेळी प्रेमभंग होतो
तरीही प्रयत्न सतत हसण्याचा,
प्रेमाच्या शोधात भटकण्यासाठी
क्षण एक पुरे प्रेमाचा!

प्रत्येक स्वप्न पूर्ण होत नाही
तरीही छंद स्वप्ने पाहण्याचा,
स्वप्नांना वास्तवात आणण्यासाठी
क्षण एक पुरे प्रेमाचा!

त्या एका सोनेरी क्षणासाठी
मी ऋणी आहे तिचा,
तिला भरपूर प्रेम करण्यासाठी मात्र
क्षण एक न पुरे प्रेमाचा!

Wednesday, 23 March 2011

अशीही प्रेम कहाणी...


   
 
 
मी तिच्याकडे सारखा बघतो
पण ती माझ्या कडे बघत नाही,
याचा अर्थ असा नाही की
ती माझ्यावर प्रेम करत नाही!

ती माझ्यावर खरंच
खूप प्रेम करते,
म्हणूनच तर ती मला
रोज भेटायला येते!

ती माझ्याशी खूप गप्पा मारते
पण मी तेव्हा शांत असतो,
बोलता बोलता ती रडायला लागल्यावर
मी अस्वस्थ होतो!

मी तिला खूप समजावतो
पण काही उपयोग होत नाही,
माझ्या मनातल्या भावना
तिला समजत नाहीत!

अंधार पडू लागल्यावर
ती निघून जाते,
जाण्यापूर्वी एक फूल
माझ्या थडग्यावर ठेवून जाते!

Tuesday, 22 March 2011

ती येते तेव्हा...

ती येते तेव्हा...
रणरणत्या उन्हातही
वाऱ्याची थंड लहर वाहते,
शरीरावरून घामाच्या धारा वाहत असतानाही
अचानक काटा उभा राहतो!

ती येते तेव्हा...
सूर्य तळपत असतानाही
उगाचंच पाऊस पडल्यासारखा वाटत,
तिच्या मनाप्रमाणे ऋतू बदलत असतील
अशी शंका मनात येते!

ती येते तेव्हा...
एक वेगळाच सुगंध
मन मोहून टाकतो,
तिची ती नखरेल चाल
डोळ्यांना बांधून टाकते!

ती येते तेव्हा...
तिचा कमनीय बांधा
मिठीत घ्यावासा वाटतो,
तिच्या मोकळ्या केसांतून
हात फिरवावासा वाटतो!

ती येते तेव्हा...
तिच्या नयनांतून वाहणारे
अमृत प्यावेसे वाटते,
तिच्या एका सुंदर हसण्याने
धुंद होऊन जावेसे वाटते!

पण, ती येऊन माझ्या बाजूने
माझ्याकडे न बघता निघून जाते तेव्हा...
माझ्या सर्व कल्पनांना
आवर घालावा लागतो,
पुढच्या वेळी ती नक्की तुझी राणी बनेल
अशी समजूत मनाची घालावी लागते!

ती पुन्हा येईल तेव्हा...