Monday, 4 March 2013

Body…

ती body काळोखात तशीच पडली असणार,
रात्रीच्या वेळी तिथे कुत्रसुद्धा नाही भटकणार,
धप्प! असा आवाज झाला असेल पण कोणाला कळणार?
मी फक्त लांबून असाच बघत असणार!

सकाळपर्यंत ती body तशीच पडून राहणार,
मग कोणीतरी जाऊन पोलिसांत वर्दी देणार,
पोलिस येणार चौकशी करणार, पंचनाम्याच नाटक रचणार,
मी फक्त लांबून असाच बघत असणार!

कोण, कुठला, कसा होता? सगळी माहिती काढणार,
शेजारी-पाजारी राहणाऱ्यांना अनेक प्रश्न विचारणार,
आपापल्या बिळात लपून बसणाऱ्यांना काय माहित असणार?
मी फक्त लांबून असाच बघत असणार!

पोलिस मग पूर्ण खोली कसून कसून तपासणार,
एक Laptop, Guitar आणि रिकामी बाटली सापडणार,
Suicide च कारण काय असेल याचा तर्क बांधणार,
मी फक्त लांबून असाच बघत असणार!

"याला कोणी ओळखत का?" म्हणून पेपरमध्ये बातमी देणार, 
आई-बाप तर नव्हतेच मग नातेवाईक कुठून असणार?
शेवटी बेवारस घोषित करून अंत्यसंस्कार करणार,
मी फक्त लांबून असाच बघत असणार!

जिवंतपणी एकटा होता, पण मेल्यावर एकटा नसणार,
त्याच्या जोडीला असे कितीतरी मेले असणार,
ह्या महिन्यात ३ झालेत, अजून किती जणांना पोहोचवणार?
मी फक्त लांबून असाच बघत असणार!