डोळ्यांत पाणी आणि ओठांवर नाव तुझे आहे,
सोडून गेलीस जो हात, तो तुला थांब म्हणत आहे,
नजर माझी अडकली आहे तुझ्या दूर जाणाऱ्या पावलांत,
फक्त एकदा वळून पहा तू माझ्या डोळ्यांत!
खांद्यावर डोकं ठेवून तुझं ते तासन्तास बसणं,
हात माझा धरून स्वप्नांच्या दुनियेत भटकणं,
कितीतरी रात्री हरवल्या आहेत त्या स्वप्नांच्या शोधात,
फक्त एकदा वळून पहा तू माझ्या डोळ्यांत!
तुझा नखरेल राग आणि गालात हळूच हसणं,
" किती प्रेम करतो? का करतो?" असे वेडे प्रश्न विचारणं,
सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत माझ्या एका चुंबनात,
फक्त एकदा वळून पहा तू माझ्या डोळ्यांत!
तुझ्या मिठीत असतानाचा तो प्रत्येक क्षण,
फक्त एकमेकांचे झालेलो ते दोघं आपण,
भिजत राहायचं आहे तुझ्या प्रीतीच्या पावसात,
फक्त एकदा वळून पहा तू माझ्या डोळ्यांत!
कुशीत तुझ्या झोपल्यावर माझ्या केशांशी तुझं खेळणं,
माझ्या डोळ्यांत सदैव स्वतःचा चेहरा शोधणं,
तुझा अस्तित्व सामावलं आहे माझ्या कणाकणात,
फक्त एकदा वळून पहा तू माझ्या डोळ्यांत!
mast aahe.....
ReplyDelete