Thursday, 15 August 2013

२ दिवसांसाठीचा भारतीय!!!

देशभक्तीपर गीतांचा मारा सुरु होईल,
पुन्हा एकदा ती गाणी ऐकण्याचा दिवस आला होता,
गाणी ऐकून प्रेरणा मिळाली तरी ती तेवढ्यापुरतीच आहे,
कारण मी फक्त दिवसांसाठीचा भारतीय आहे!

प्रत्येकाच्या छातीवर तिरंगा झळकेल,
SMS, Facebook वर देशाचा उद्धार होईल,
ही देशभक्ती फक्त share आणि like पुरतीच मर्यादित आहे,
कारण मी फक्त दिवसांसाठीचा भारतीय आहे!

जागोजागी ध्वजारोहण केलं जाईल,
मोडकं-तोडकं का होईना पण राष्ट्रगीत गायलं जाईल,
पिक्चरच्या आधी लागलं की उभं राहायला पण कंटाळा आहे,
कारण मी फक्त दिवसांसाठीचा भारतीय आहे!

राष्ट्रध्वजाला सलाम एवढीच ती काय माझी देशभक्ती,
वर्षातले हे दिवस म्हणजे हक्काची सुट्टी,
Sunday ला आले की १५ ऑगस्ट पण waste आहे,
कारण मी फक्त दिवसांसाठीचा भारतीय आहे!

आज जितके भारतीय आहोत तेवढेच रोज का नाही?
प्रत्येक क्षणी देशाला तुमची गरज आहे,
पण आपला-आपला स्वार्थ हेच आमचं ध्येय आहे,
कारण मी फक्त दिवसांसाठीचा भारतीय आहे!

देशाला भ्रष्टाचाराने ग्रासलंय, महागाईने मारलंय,
आज कालच्या नेत्यांनी तर देशाला विकायला काढलंय,
देश जाऊदे खड्ड्यात तरी मी निवांत आहे,
कारण मी फक्त दिवसांसाठीचा भारतीय आहे!

ज्या तिरंग्यासाठी रक्त वाहिलं गेलं तो उद्या कचऱ्यात दिसणार आहे,
ज्या स्वतंत्र भारताचं स्वप्न बघितलं ते स्वप्नच राहणार आहे,
स्वतंत्र झालो तरी अजून गुलामगिरीतच जगत आहे,

कारण मी फक्त दिवसांसाठीचा भारतीय आहे!

Sunday, 9 June 2013

"पैसा" झालाय मोठा

बेइमानिच्या बाजारात विकली जात आहे "माणुसकी",
फसवणुकीच्या दरबारात होत आहे "सत्याची" होळी,
"प्रामाणिकपणा" कधी काळीच रिटायर झाला होता,
कारण "पैसा" झालाय मोठा आणि "माणूस" झालाय खोटा!

आज-काल माणुसकी फक्त नावालाच आहे उरली,
माणुसकी सोडा, लोकं रक्ताच्या नात्यांना आहेत विसरली,
मैत्री, प्रेम सगळं झूठ! लोकांना दिसतात फक्त नोटा!
कारण "पैसा" झालाय मोठा आणि "माणूस" झालाय खोटा!

खरं बोलणारा माणूस इथे क्वचितच सापडतो,
प्रत्येकजण दुसऱ्याला फसवून स्वतःचा फायदा करतो,
जो खरा वागतो त्याचा नेहमीच होतो तोटा,
कारण "पैसा" झालाय मोठा आणि "माणूस" झालाय खोटा!

चिरीमिरी दिल्याशिवाय इथे कामच होत नाही,
टेबलाखालून सरकवल्याशिवाय फाईलसुद्धा हलत नाही,
प्रामिकपणे वागण्याचा जणू नियमच केला होता,
कारण "पैसा" झालाय मोठा आणि "माणूस" झालाय खोटा!

पैश्याच्या लखलखाटात माणूस आंधळा झाला आहे,
पैशाच्या ताकदीसमोर स्वतःला हरवून बसला आहे,
विसरला आहे की पैश्याने माणूस नाही, माणसाने पैसा बनवला होता,

कारण "पैसा" झालाय मोठा आणि "माणूस" झालाय खोटा!

Sunday, 5 May 2013

मला प्रेम करायचंय!


अशी जवळ बस, मला खूप काही सांगायचंय,
तुझ्या-माझ्या, आपल्याबद्दल खूप काही ठरवायचंय,
यापुढचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत रहायचंय,
मला तुझ्यावर भरभरून प्रेम करायचंय!

तुझा प्रत्येक शब्द नाजुक फुलाप्रमाणे जपेन,
तुझी प्रत्येक फ़रमाइश मी पूर्ण करेन,
माझ्या दुनियेची राणी तुला बनवायचय,
मला तुझ्यावर भरभरून प्रेम करायचंय!

तुझ्या डोळ्यांत अश्रू येणं, हे माझं ध्येय असेल,
तुझ्या सगळ्या समस्यांचं समाधान पण मी असेन,
तुला नेहमी सुखात - आनंदात ठेवायचंय,
मला तुझ्यावर भरभरून प्रेम करायचंय!

मला जास्तं काही नको, फक्त हवा तुझा सहवास,
नेहमी पाठीशी असणारा एक खंबीर आधार,
तुझा हात धरून जीवनाच्या वाटेवर चालायचय,
मला तुझ्यावर भरभरून प्रेम करायचंय!

कुठे आहेस तू? वाट पाहतोय मी तुझी,
हृदयातली ती जागा अजूनही आहे रिकामी,
एकटं राहून कंटाळलोय, मला फक्त तुझ्यासाठी जगायचंय,
मला तुझ्यावर भरभरून प्रेम करायचंय!

Monday, 4 March 2013

Body…

ती body काळोखात तशीच पडली असणार,
रात्रीच्या वेळी तिथे कुत्रसुद्धा नाही भटकणार,
धप्प! असा आवाज झाला असेल पण कोणाला कळणार?
मी फक्त लांबून असाच बघत असणार!

सकाळपर्यंत ती body तशीच पडून राहणार,
मग कोणीतरी जाऊन पोलिसांत वर्दी देणार,
पोलिस येणार चौकशी करणार, पंचनाम्याच नाटक रचणार,
मी फक्त लांबून असाच बघत असणार!

कोण, कुठला, कसा होता? सगळी माहिती काढणार,
शेजारी-पाजारी राहणाऱ्यांना अनेक प्रश्न विचारणार,
आपापल्या बिळात लपून बसणाऱ्यांना काय माहित असणार?
मी फक्त लांबून असाच बघत असणार!

पोलिस मग पूर्ण खोली कसून कसून तपासणार,
एक Laptop, Guitar आणि रिकामी बाटली सापडणार,
Suicide च कारण काय असेल याचा तर्क बांधणार,
मी फक्त लांबून असाच बघत असणार!

"याला कोणी ओळखत का?" म्हणून पेपरमध्ये बातमी देणार, 
आई-बाप तर नव्हतेच मग नातेवाईक कुठून असणार?
शेवटी बेवारस घोषित करून अंत्यसंस्कार करणार,
मी फक्त लांबून असाच बघत असणार!

जिवंतपणी एकटा होता, पण मेल्यावर एकटा नसणार,
त्याच्या जोडीला असे कितीतरी मेले असणार,
ह्या महिन्यात ३ झालेत, अजून किती जणांना पोहोचवणार?
मी फक्त लांबून असाच बघत असणार!

Friday, 15 February 2013

जोडीदार…


जीवनाच्या वाटेवर आपण एकटेच असतो चालत,
परिस्थितीच्या खड्ड्यांतून स्वतःला सावरत,
वाटतं...कुणीतरी यावं, द्यावा आपल्याला आधार,
प्रत्येकजण शोधत असतो असाच एक जोडीदार!

आपली एक हाक ऐकून त्याने धावत यावं,
Superman बनून आपल्याला वाचवावं,
वाटतं...सगळ्या problems चं solution त्याच्याकडून मिळणार,
प्रत्येकजण शोधत असतो असाच एक जोडीदार!

आनंदात नाचताना त्यानेही सोबत ताल धरावा,
डोळ्यांत अश्रू आले तर पुसायला त्याने रुमाल द्यावा,
वाटतं...आपल्या मनातलं सगळं त्याला समजणार,
प्रत्येकजण शोधत असतो असाच एक जोडीदार!

त्याने नेहमी सोबत राहावं, सगळे हट्ट पूर्ण करावे,
राग आल्यावर त्याने आपल्याला प्रेमाने समजवावे,
वाटतं...त्याच्या मिठीतच आपले सर्वस्व सामावणार,
प्रत्येकजण शोधत असतो असाच एक जोडीदार!

आपण ज्याला जोडीदार बनवतो, त्याचे आपण असतो जोडीदार,
आपण ज्या अपेक्षा करतो, त्या त्याच्या कोण पूर्ण करणार?
खरंच आपण किती स्वार्थी असतो, करतो फक्त स्वतःचा विचार,
मग बनणार का तुम्ही एकमेकांचे पक्के जोडीदार???